सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यघटनेचा अभ्यास फक्त परीक्षापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने राज्यघटना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ व कायद्याच्या पुस्तकाचे लेखक गणेश आळंदीकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ( बारामती ) येथील सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालयात "राज्यघटनेचे स्वरूप व महत्त्व" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. के. हजारे होते.
ते पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीने भविष्यातील पिढ्या लक्षात घेऊन जगातील भव्य अशी राज्यघटना तयार केली आहे. संसदेला कायदे करताना घटनेच्या मूलभूत साच्यात बदल न करता करावे लागतात. १९५० पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यातून घटनेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. मूलभूत अधिकारांसोबतच प्रत्येक नागरिकाने मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे.”
त्यांनी सांगितले की, घटनेच्या तरतुदींच्या विरोधात तयार झालेले अनेक कायदे पूर्वी राज्यांना रद्द करावे लागले आहेत. तसेच मूलभूत अधिकारांची व्याप्तीही न्यायालयीन खटल्यांतून स्पष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांनी किमान राज्यघटना व मूलभूत अधिकार समजून घेतले, तर ते आयुष्यभर उपयोगी पडतील, असे आळंदीकर म्हणाले.
प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य एस. के. हजारे यांनी केले, तर आभार प्रा. अमर घाडगे यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील संगणक, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल विभागांचे प्रमुख तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments